सध्या मराठी आणि हिंदी सिनेमामध्ये चरित्र कथांचे पेव फुटलंय! आणि आनंदाची गोष्ट अशी की त्यातले बहुतेक प्रयोग हे अतिशय उत्तम होते! तर अशीच ही एक चरित्र कथा पण सगळ्यांहुन जास्त क्रांतिकारक!
आनंदीबाई जोशी हे आपल्यातील बहुतेक लोकांनी ऐकलेले नाव आहे. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. पण एका वाक्यात त्यांचं कर्तृत्व सिद्ध होत नाही. त्यासाठी बालविवाह, स्वतःच्या अर्भकाचा मृत्यू, सवतीच्या कुटुंबाचा सांभाळ, मुली/बायका ह्यांना शिक्षणापासून कटाक्षाने दूर ठेवण्याची वृत्ती, घर, चूल अन मूल हेच आयुष्य, तिरसट आणि त्याच्या डोक्यातल्या ध्येयासाठी झपाटल्याने काहीही करायला तयार झालेला नवरा ह्या सगळ्यांना सामोरं जाणं होतं !!! ह्या सगळ्याची अशी ही एक कहाणी आहे…
साडीखाली सॉक्स आणि शाळेचे काळे बूट घातलेली आनंदी हे दृश्य माझ्यामते ह्या सिनेमाचा काही अंशी सारांश आहे. सिनेमाला वेग चांगला आहे आणि कुठेच ओढाताण केल्यासारखं वाटत नाही.ह्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशा कहाणीत तुम्ही गुंतत जाता. गाणी मोजकी आणि कथानकाला पोषक आहेत.
ललित प्रभाकर हम्पी नंतर दोन वर्षाने सिनेमात झळकलाय. एका वेगळ्याच भूमिकेत, पत्नीला शिकवण्याच्या जिद्दीने पेटून उठलेला आणि अनेकदा त्यासाठी टोकाच्या भूमिका घेणारा नवरा, त्यासाठी कुंटुंबाशी आणि समाजाशी दोन हात करायला पुढे मागे न पाहणारा पुरुष! आणि ह्या सगळ्यासाठी १५० वर्षांपूर्वी, प्रसंगी घरकाम करणारा, बायकोला सातासमुद्रापार एकटं पाठवायला तयार झालेला, स्वतः आर्थिक काटकसर करणारा नवरा! ललित प्रभाकरने ही भूमिका चांगलीच पार पाडली आहे. भाग्यश्री मिलिंदने पण कुठेच कसर सोडली नाही आहे.
अशाच विविध क्षेत्रातील अति पराक्रमी, धाडसी आणि जिद्दी लोकांनी आपला देश इथवर आणलाय! आता आपल्याला तो पुढे कुठे न्यायचाय ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे!!!
आपल्यापैकी किती लोकांना हे माहीत आहे की शुक्रावरील एका विवराला आनंदीबाईंचं नाव देण्यात आलंय??