स्वप्नील जोशी म्हणजे अनिकेत हा एका विवाहबाह्य संबंधापाई \”खून\” करायला निघालेला नवरा आहे. बायको घटस्फोट देत नाही म्हणून इतक्या टोकाचं पाऊल उचलायला तो उद्युक्त झालेला असतो. त्याची बायको अवनी म्हणजे अनिता दाते, ही काही खऱ्या आणि काही खोट्या परिस्थितींमुळे आधीच नैराश्याने ग्रासून गेलेली असते. तशा गंभीर परिस्थितीत प्रासंगिक विनोद निर्मितीचा हा प्रयत्न आहे.
लेखक पती-पत्नी जोडी मधूगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी ह्यांनी चोख पद्धतीने कथा विणली आहे. उत्तरार्धामधली १०-१५ मिनिटे सोडली तर सिनेमा तुम्हाला खिळवून ठेवतो. पण एखाद्या सुस्पेन्स थ्रिलर वेड्या माणसाने डोक्याला ताण दिला तर त्याला ह्या चित्रपटातील अनेक प्रसंग हे predict करता येऊ शकतात, अगदी क्लायमॅक्स सुद्धा.. फक्त चित्रपट शिर्षकावर थोडं मंथन केलं तर! खुना भोवती घोटाळणाऱ्या रहस्य कथेमध्ये विनोदी संवाद टाकणं ही तारेवरची कसरत छान जमली आहे. ह्या सिनेमाद्वारे विवाहबाह्य संबंध, मानसिक अस्थैर्य/ आजार, पती-पत्नीतील संबंध, भावनेच्या भरात केलेल्या गोष्टीचे परिणाम, आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे केलेले दुर्लक्ष ह्याचे मोठे परिणाम अशा विविध पैल्लुंना हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता परेश मोकाशी हा आपल्याला \”हरिश्चंद्राची फॅक्टरी\” ह्या सिनेमामुळे माहीत आहेच. हा सिनेमा भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके ह्यांच्या पहिला सिनेमा \”राजा हरिशचंद्र\” च्या प्रवासावर आधारित आहे. प्रत्येकाने जरूर पहावा असा हा सिनेमा आहे. शिवानी सुर्वेनी एका गरम डोक्याच्या पण चाणाक्ष बेधडक डॉक्टरची भूमिका चांगली केली आहे. तिच्या आवाजातील चढ उतार आणि देहबोली बरंच काही सांगून जाते. सुबोध भावेचा चा प्रवेश बराच उशिरा होऊनही तो एक वेगळीच छाप सोडून जातो. प्रसंगी बुचकळ्यात पडणारा आणि भावनेत वाहत जाणारा हा सुबोध भावेंचा \”मनोविकारतज्ञ\” विरोधाभासी वाटतो.