फास्टर फेणे……. 🕵️🕵️ २८/१०/१७

आमच्यासारख्या नोकरदार माणसांना fastest, म्हणजे फर्स्ट डे फर्स्ट शो तर काही शक्य नसतं म्हणून आम्ही मित्र faster, म्हणजे फर्स्ट डे लास्ट शो ला गेलो… अगदी अचानक ठरून… लहर आली म्हणून! लहर आमची आणि कहर फेण्याची!!

सिनेमा पहात असताना असा प्रश्न पडतो की जास्त जोरात काय चालतंय, बन्या च डोकं की सिनेमाचे कथानक!! एक सतत गुप्तहेरासरखं डोकं चालणारा बन्या, त्याला अचानक भेटलेली त्याची बालमैत्रीण आणि गुन्हेगारी पत्रकारितेत रस असणारी अबोली, आणि पोटासाठी भुरट्या चोऱ्या करणारा भूभू हे त्रिकुट एका आत्महत्येचा उकल कसा करतात त्याची ही कथा आहे. पण ही एवढी सरळ कहाणी नाही. ह्या सगळ्यात किती मोठ्या लोकांचा करोडो रुपयांचा बाजार आहे त्याची ही रहस्य कहाणी आहे. गिरीश कुलकर्णी अप्पा हे पात्र १५-२० वर्षांपासून जगत आहेत असं वाटावं, इतकं ते सहजसुंदर आपल्यासमोर येतं. दिलीप प्रभावळकर ह्या दिग्गज आणि ज्येष्ठ कलावंताबद्दल माझ्यासारख्याने काय बोलायचं?

सिनेमात एकही गाणं नाही आणि कथे ला चांगलाच वेग असल्याने झोपणं तर दूरच पण सगळ्या घटनांची डोक्यात नोंदणी व्हायला सतर्क राहायला लागतं. रहस्यमय आणि गंभीर विषय असूनही चांगल्या आणि अनपेक्षीत असे विनोदी संवाद हशा पिकवतात. बराचसा सिनेमा पुण्यातच चित्रित झाला असल्याने तो पुणेकरांना अजून जवळचा वाटेल. फास्टर फेणे च्या ह्या पेपराला माझ्याकडून शंभर पैकी नव्वद गुण!!

पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। सिनेमा हॉल मधून बाहेर येईस्तोवर विसरून जाण्याचा सिनेमा नाही हा!! सिनेमा शेवटा कडे जात असताना मला एक प्रकरण आठवलं! ३०-३५ वर्षापूर्वी महाराष्ट्र च्या मुख्यमंत्र्यांना एका सामान्य माणसाने कोर्टात खेचून सर्व दमदाटी ला सामोरे जात कसा विजय मिळवला त्याचा सविस्तर वृत्तांत विख्यात मानसोपचार तज्ञ आनंद नाडकर्णी ह्यांनी आपल्या \’गद्धेपंचवीशी\’ ह्या पुस्तकात मांडला आहे, तो जरूर वाचवा! खूप प्रेरणादायी आहे!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *