Hirkani review.. कथा हिरकणीची, सिनेमा यथा तथाच!!

शिवाजी महाराज आणि स्वराज्य ह्या विषयावर मराठी सिनेमे येत आहेत ही खुप आनंददायी गोष्ट आहे. आणि त्यात दंतकथा वाटणारी अशी हिरकणीची कहाणी म्हटल्यावर पर्वणीच होती!

ह्या कथेत जशी हिरकणी च्या मातृप्रेमाची परीक्षा आहे तसाच सिनेमा सुरुवातीपासूनच तुमच्या संयमाची परीक्षा पाहतो! पहिल्या १० मिनिटात दोन बॅक टू बॅक गाणी आहेत. शेवट होईपर्यंत हिराला (हिरकाणीला) जसं महाराजांचं दर्शन होत नाही तसंच प्रेक्षकांपासून त्यांचा चेहरा दूर ठेवला आहे ही एक चलाख कल्पना आहे. संगीत बेताचं वाटलं. करन जोहर सारखं उगाच गाण्यातल्या एक शॉट साठी चिन्मय मांडलेकर आणि जितेंद्र जोशी ह्यांना घेतलं आहे. सिनेमाची प्रत्यक्ष कहाणी सुरू व्हायला मध्यंतर उगवतं. सिनेमा पूर्णपणे सोनाली कुलकर्णीच्या खांद्यावर आहे. तिचा अभिनय, चेहऱ्यावरील हावभाव, मुलाला सुखरूप बघण्यासाठीची व्याकुळता, हे सगळं एकदम जमून गेलंय. मात्र काही कलाकारांचा अभिनय अगदीच कृत्रिम वाटतो. आणि विनोदी म्हणून लिहिलेले संवाद हास्यास्पद वाटतात!! सिनेकर्त्यांनी संजय लीला भन्साळी कडून थोडे भव्य सेट उभारण्यासाठी धडे घेतले असते तर कपडे आणि सेट उठून दिसले असते. काही गोष्टी तर खूप खटकतात पण.. मग ते फेटा झाडाला बांधून डोंगर कडा उतरणं असो की लांडगा दाखवण्यासाठी वापरलेले अतिशय सुमार पद्धत्तीचे ग्राफिक्स असो. हल्ली कॉम्प्युटर गेम मधे पण ह्यापेक्षा चांगले ग्राफिक्स असतात. अलीकडेच आलेल्या फर्जंद ह्या सिनेमातील CGI ग्राफिक्स कडून इतर निर्मात्यांनी धडा घेतला पाहिजे. शिवाय कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय एका घावात हिरा लाकडी भाल्याने लांडग्याला मारते हे बाळबोध आणि हास्यास्पद वाटतं. \”लांडग्याच्या डोळ्यात बघायचं म्हणजे कळतं तो कधी वार करणारे\” केवळ ह्या एक वाक्याला मी तरी प्रशिक्षण म्हणत नाही!!

सुदैवाने सिनेमा फार मोठा नाहीये. एकूण केवळ सोनाली कुलकर्णीचा अभिनय म्हणून हा सिनेमा पाहता येऊ शकतो..