Dhurala review.. \’धुरळा\’.. नात्यांचा, विश्वासाचा आणि सिनेमाचा पण??

मराठी चित्रपटात क्वचितच एवढी मोठी स्टारकास्ट एकत्र आली असेल, आणि तेही जवळसपास सगळे एकाच पिढीतील! त्यामुळे आणि सिनेमाच्या टिजरमुळे उत्कंठा शिगेला पोहोचली होती! पण जे बहुतेक मराठी सिनेमांबद्दल होतं तेच झालं.. कधी सिनेमागृहात आला आणि कधी गेला ते कळलंच नाही.. शेवटी आज काय तो योग आला पहाण्याचा..आपल्याला ट्रेलरवरून लक्षात येतंच की सिनेमा एका निवडणुकीच्या राजकारणाभोवती फिरतो. लेखक क्षितिज पटवर्धन याने केवळ कमाल केली आहे. अलीकडे पानचट विनोदांशिवाय मराठी चित्रपट पूर्ण होतंच नाही!! पण इथे लेखकाने आपली जादू दाखवली आहे. \’सत्ता येते जाते, माणसं राहतात\’ ह्या सई ताम्हणकरच्या वाक्याला तितक्याच तोडीचं आणि योग्यतेचं \’आणि निवडणुकीत ती कळतात\’ हे सोनाली कुलकर्णीचं तोंडात मारणारं प्रत्युत्तर हे त्यापैकीच एक!! शाब्दिक कोट्यांमध्ये तर त्याचा \’हात\’ धरणं त्याच्या समकालीन लेखकांना नक्कीच अवघड जाईल! दोन स्पेशल आणि नवा गडी नवं राज्य ही नाटकं आणि फास्टर फेणे आणि टाईम प्लिज सारख्या सिनेमांची त्याची परंपरा त्याने पुढे चालू ठेवली आहे. समीर विद्वांसचे दिग्दर्शनही वाखाणण्याजोगे आहे!ह्यापूर्वी कळत नकळत अंकुश चौधरीने ७०-८० च्या दशकातल्या अमिताभला कॉपी करण्याचा यशस्वीरीत्या प्रयत्न केला आहे. तेच ह्यामध्ये पण दिसेल. तसेही शरीरयष्टीतील साम्य आहेच. शिवाय बॉडी लँग्वेज, डाव्या हाताने टाळ्या वाजवणे, हेही आहेच इथे. त्याचं सुरुवातीचं भावुक भाषण असेल, राजनैतिक निर्धार असेल किंवा त्याच्यामुळे मागे पडत चाललेलं बायकोवरचं प्रेम असेल, त्याने सगळंच तितक्याच ताकदीने पडद्यावर उतरवलं आहे. त्याची सगळ्याच अर्थाने धर्मपत्नी असलेली सई ताम्हणकर.. अजून एक experimental कलाकार. सईची जाहीर सभा असो की, गरोदरपणात आणि नवऱ्याच्या इच्छा आकांक्षात होणारी फरफट आणि हेळसांड असो.. सगळं एकदम जमून गेलं आहे! सोनाली कुलकर्णीची महत्वाकांक्षी, पण नवरा आणि एकूणच कुटुंबामुळे एखाद्या विस्फोटक ज्वालामुखीप्रमाणे दबून राहिलेली भूमिका जबरदस्त आहे. तिच्या जोडीला, म्हणजे शब्दशः जोडीदाराची भूमिका करणारा सिद्धार्थ जाधवने एक लोकल गुंड, कुटुंबातील राजकारण कितीही टोकाला गेलं तरी नात्यांना महत्व देणारा नवरा, भाऊ, मुलगा आणि दीर साकारला आहे. अमेय वाघची tragedy पण हळू हळू उलगडत जाते. एका नेत्याच्या शांत आणि सतत \’पडद्यामागेच\’ राहिलेल्या बायकोकडे सुद्धा काय काय गुपितं असू शकतात हे अलका कुबल मधून दिसतं. प्रसाद ओक हा सत्तेसाठी कुठल्याही थराला जाणारा प्रतिद्वंद्ववी आहे.निवडणुकीतल्या बोटावरच्या काळ्या डागाभोवती फिरणाऱ्या ह्या राजनैतिक सिनेमावर बोट ठेवावं असा काळा डाग फारसा कुठे दिसत नाही. उत्तरार्धात काही अंशी सिनेमा संथ होतो. सिनेमाच्या शेवटाकडे जायला लागल्यावर शेवट predict करणं फारसं अवघड जात नाही. पण घरातली मनं परत एकत्र आणणारा हा सिनेमा मनात घर करून जाईल हे नक्की!!

1 thought on “Dhurala review.. \’धुरळा\’.. नात्यांचा, विश्वासाचा आणि सिनेमाचा पण??”

  1. मोजक्या शब्दात उत्कंठा निर्माण करण्यात यशस्वी….
    सिनेमा गृहात जाणे बंद झाल्यापासून एखादा वेगळा सिनेमा पाहण्याची इच्छा हा सिनेमा नक्की पूर्ण करेल असे दिसतेय
    उद्याच आम्ही सुध्दा पाहु!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *