माधुरी दिक्षित-नेनेने मराठी चित्रपटात काम करावं ही नक्कीच समस्त मराठी सिनेरसिकांच्या बकेट लिस्ट वरची गोष्ट होती!!! तिने १९८४ साली वयाच्या १७ व्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर आता तब्बल ३४ वर्षानंतर ती इच्छापूर्ती झाली!
सिनेमाच्या शिर्षकावरून आपल्याला काहीतरी वेगळं अनुभवायला मिळेल ह्याचा अंदाज येतोच! तर सुरुवात होते ती मधुरा सानेच्या हृदय शस्त्रक्रियेपासून! पुढील काही दिवसात तिला असं वाटतं की ज्या कोणी आपल्याला नवसंजीवनी दिली त्याच्या कुटुंबाला भेटून यावं. नंतर तिला प्रेरणा मिळते ती तिच्या हृदय दात्याची ( heart donor) बकेटलिस्ट पूर्णत्वास नेण्याची!
मधूच्या ह्या प्रवासात तिला स्वतःच्या जीवनातील आणि आजूबाजूच्या लोकांतील अनेक पैलू उलगडत जातात. पणजीबरोबरचं नातं खुलत जातं तर मुलीबरोबरचं नातं विविध टप्प्यातून जाऊन शेवटी गाढ आणि प्रगल्भ बनतं. नवरा आणि सासु सासऱ्यांसाठी करत असलेली कमालीची तडजोड आणि कष्ट ह्याला कुठंतरी आळा बसून ती स्वतःच्या आनंदासाठी गोष्टी करायला शिकते! सर्वात महत्वाचं म्हणजे ती स्वतःसाठी पण जगायला शिकते.
वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही माधुरीचा तोच तजेलदार चेहरा, तेच सहजसुंदर हास्य, बोलके डोळे आणि चेहऱ्यावरचे खूप काही सांगून जाणारे हावभाव हे कायम आहे! अभिनयाबद्दल काय बोलायचं तिच्या? जिने शास्त्रीय पद्धत्तीने कथ्थक शिकले आहे आणि जी हिंदी चित्रपटसृष्टीची नृत्यसम्राज्ञी आहे तिने सिनेमात एका stage performance ला घाबरून सुरुवातीलाच कोसळून पडावं ह्यातच आलं नाही का सगळं?? सुमित राघवनने टिपिकल careeristic आणि चिंताग्रस्त कर्ता पुरुष चांगला रंगवला आहे. मधूच्या मुलीचं काम करणारी रितिका श्रोत्री ची संवादफेक (dialogue delivery) छान वाटली. सुमेध मुदगलकरने साकारलेला सलील हळूहळू खुलत जातो. रेशम टिपणीस बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर दिसते. जोडीला दिलीप प्रभावळकर, शुभा खोटे, प्रदीप वेलणकर, वंदना गुप्ते, रेणुका शहाणे, मिलिंद फाटक, ईला भाटे सारखे दिग्गज कलावंत आहेतच. हॉटेलच्या स्वयंपाकघरातल्या एका दृष्यात जरा अति होतंय असं वाटायला लागतं पण ते तेवढ्यापुरतच मर्यादित राहतं. ह्या प्रसंगात वापरलेल्या आणि पुलं च्या \”बिगरी ते मॅट्रिक\” मध्ये पण संदर्भ आलेल्या \”खबरदार, जर टाच मारुनी\” ह्या गीताचा वापर नाविन्यपूर्ण वाटतो! शेवटच्या प्रसंगात करण जोहरी नाट्यमय काहीतरी होईल अशी शंका येते पण नशिबाने तसं काही होत नाही. \”होऊन जाऊ द्या\” हे उडत्या चालीचं आणि \”तू परी\” हे त्यामनाने शांत अशी दोन्हीही गाणी कानाला सुखावह वाटतात.. श्रेय जातं ते संगीतकार रोहन रोहन ह्यांना. मलेशियातील, (म्हणजे सिनेमातला मलेशिया, खरं ठिकाण माहीत नाही) लोकेशन्स केवळ अप्रतिम आहेत! मन हेलावून टाकणारे संवाद आहेत तसेच \”दारू पिनेसे यकृत विकृत होता हैं\” असले पण आहेत! सिनेमा बद्दल एवढं बोलल्यानंतर तेजस प्रभा आणि विजय देऊसकर ह्या दिगदर्शक लेखक जोडीबद्दल वेगळं बोलायची ती काय गरज??
असा हा प्रेरणादायी, जगण्याचा नवीन दृष्टिकोन देणारा सिनेमा आहे! शिवाय अवयवदानाचे महत्व चपखल सांगणारा! उगाच बकेटलिस्ट मध्ये ठेऊन देऊ नका… लगेच पहा!!
शेवटी ह्याचा योग आज आला.
सगळा आलेख, शब्दशः पटला. मधुराची आप्तियांशी होणारी नविन ओळख, सुमितची भुमिका, मायलेकींतील बोचरी पण काळातुरूप भरत जाणारी जनरेशन गॅप, सलीलचं बहीणी, आणि तिच्या पश्चात तिच्या आठवणींवर असणारा जीव…….सगळं व्यवस्थित कॅप्चर केलंयेस.
गीतांवरच्या तुझ्या व्ह्यूझ शी तेवढं जोडता नाही आलं, कारण दोष माझा. मी गाणी पाहिलीच नाही….🙈