सर्जिकल स्ट्राईक हा अलीकडे आपल्याला रुळलेला शब्द महाराष्ट्राच्या इतिहासाला काही नवीन नाही. तर ही कहाणी आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्जिकल स्ट्राईक ची!!
विविध प्रसंग जरी दाखवले असले तरी जास्त भर हा लालमहालावरील शाहिस्तेखानावरच्या चढाईवर आहे. लढाईचे प्रसंग कुठेच कृत्रिम किंवा विनोदी वाटत नाहीत. इतक्या लोकांच्या हृदयाजवळच्या व्यक्तिमत्वाला हात घालताना प्रासंगिक विनोद निर्मिती करणं हा अतिशय धाडसी निर्णय होता, पण तेही दिग्पाल लांजेकर ह्यांनी व्यवस्थित पार पाडलंय. फर्जंद चा अनुभव आणि यश त्यांच्या गाठीशी होतंच. फर्जंद प्रमाणेच ह्या सिनेमाच्या ग्राफिक्सलाही दाद द्यावी तितकी थोडीच आहे. लालमहालात शिरल्यावर पडद्यामागून प्रकाशयोजनेमुळे अतिभव्य दिसणारी महाराजांची आकृती केवळ सुंदर घेतली आहे. चिन्मय मांडलेकरचे मानेवर न रुळता हवेत ताठ राहणारे केस खोटे आहेत ह्याची जाणीव करून देतात.
तानाजी, जिवाजी, बहिरजी, येसाजी, बाळाजी, चिमाजी, केशर, सगळेच अभिनय, वेषभूषा आणि केशभूषा ह्यात तितक्याच ताकदीने (शब्दशः सुद्धा) उठून दिसतात! मांडलेकरच्या डोक्याला फेटा म्हणून बांधलेली साडी पाहून जरा हसूच आलं. सेट ही अतिशय राजेशाही दिसतात. बहिरजी नाईक ह्यांचे अचानक विविध ठिकाणी वेष बदलून उभं ठाकणे हे तुम्हाला एक एक धक्का देत जातं. तृप्ती तोरडमल एक ताठ मानेने पण वास्तवाला धरून चालणारी आणि विस्तवाशी न खेळणारी राय बागन साहेबा म्हणून शोभते. समीर धर्माधिकारी खरंच एक निष्ठावान, क्रूर सरदार म्हणून भाव खाऊन जातो ते त्याच्या देहबोली, वेषभूषा आणि संवादफेक मधून!
चिन्मय मांडलेकरच्या देहबोलीत सतत एक आत्मविश्वासी द्रष्टा दिसतो, तो इथेही आहेच! लढाई, त्याआधीचा monologue, संवादफेक हे उत्तम जमून आलंय. मृणाल कुलकर्णीने ह्यापूर्वी जिजाबाई, अहिल्याबाई, रमाबाई अशा अनेक ऐतिहासिक भूमिका केल्या आहेत आणि गाजवल्या आहेत. ही भूमिका सुद्धा तोडीसतोड आहे. देहबोली आणि संवादफेक मध्ये महाराणीचा साज आणि त्याबरोबरच एक द्रष्टेपणा आणि दिशादर्शकता दिसून येते. गाणी मोजकी आणि आटोपशीर आहेत.
एक लाख मुघल सैन्याला चाहुलही न लागू देता नव्वद मावळ्यांनी धुमाकूळ घातला.. गनिमी काव्याने! पुलं नी म्हटल्याप्रमाणे अफझलखानाच्या पोटापासून शाहिस्तेखानाच्या बोटापर्यंत नाकीनऊ आणणाऱ्या शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूरवीरांना शतशः नमन!