पाहायचं हे तर नक्की होतंच, प्रश्न फक्त कोणाबरोबर आणि केव्हा हा होता! आणि अनेक वर्षानंतर मातोश्रींबरोबर सिनेमा पाहण्याचा योग आला. हल्ली सिनेमातला मधलाच प्रसंग सुरुवातीला दाखवून अर्ध्याहुन अधिक सिनेमा फ्लॅशबॅकसारखा दाखवण्याची फॅशन झालीये. हा पण त्याला अपवाद नाही…
बालगन्धर्व, कट्यार, टिळक मधल्या एकसे एक भूमिकांनंतर सुबोध भावे आपल्याला इथे प्रमुख भूमिकेत दिसतो. एका टीव्ही मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे त्याने किंवा इतर कोणत्याही ह्या सिनेमातल्या अभिनेता/अभिनेत्रीने घाणेकरांच्या बद्दल काहीही न वाचता/बघता दिगदर्शक सांगेल त्याप्रमाणे अभिनय केला… नैसर्गिक वाटावे म्हणून असेल कदाचित.. पण मला सिनेमा बघून बाहेर येताना खूप असं वाटत होतं की सत्य आणि सिनेमा ह्याचा लेखाजोगा घ्यावा. हे करेस्तोवर ८ दिवस गेले आणि अचानक कांचन काशीनाथ घाणेकर ह्यांची अलीकडची टीव्ही मुलाखत बघण्याचा योग्य आला.
कथानक सांगण्यात मी विश्वास ठेवत नाही ते स्वतःच अनुभवावे प्रत्येकाने. बाकी भावे भाव खाऊन जातो, किंबहुना त्याच्यावर सतत तेव्हढा फोकस ठेवण्यात आलाय. पेशाने डॉक्टर असतानाही रंगभूमीवर स्वतःला सिद्ध करण्यासाठीची तळमळ, बेंबीच्या देठापासूनची संवादफेक, ते \’एकदम कडक\’, त्याबरोबर येणारी अफाट प्रसिद्धी आणि प्रेम आणि पैसा, आणि ह्या सगळ्यात कुठेतरी वाहात जाणारे डॉक्टर घाणेकर ह्याचं चित्रण उत्तम केलं आहे!! कांचन घाणेकर यांनी पण आपल्या मुलाखतीत ह्याला दुजोरा दिला आहे.
पहिल्यांदा मराठी रंगभूमीत हाऊसफुल चे बोर्ड लागणं, शिट्या आणि टाळ्यांनी प्रवेशाला स्टेजवर स्वागत होणं, नाटक संपल्यावर प्रेक्षकांच्या गराड्यातुन चालत जात वाहवा मिळवणं हे खरंच किती अद्भुत असेल नाही का?? त्याकाळी संभाजी महाराजांच्या राजेशाही भाषे आणि वेशभूषेपासून ते लाल्या सारख्या पूर्ण वाया गेलेल्या कारट्या पर्यंतच्या भूमिका, कडक, झकास असले शब्द, आपल्या वडलांच्या एका छोट्याश्या कौतुकासाठी आयुष्यभर धडपडणारा मुलगा आणि आपल्यापेक्षा वयाने बऱ्याच लहान असलेल्या मुलीवरच्या प्रेमाखातर वेडा झालेला तरुण हे cocktail काही औरच असेल नाही!!
एका अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालेल्या प्रयोगानंतर वडलांकडून मात्र काहीच प्रतिसाद न मिळाल्याने दुःखी आणि हताश झालेल्या काशीनाथचे अश्रू संभाजीच्या तलवारीवर पडतात आणि क्षणार्धात तो ती नंगी तलवार तशीच म्यान करतो… जणूकाही ती आठवण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात खोल ढकलून देतो…कपारीत! तशीच अप्रतिम आहे घाणेकर आणि लागू ह्यांची एका समारंभातली जुगलबंदी!!
दुसरा एक प्रसंग.. पणशीकर: तुझं ना काशा, वर्गातल्या brilliant मुलासारखं आहे, जो मस्ती हे दाखवायला करतो की माझं कोणीच काही वाकडं करू शकत नाही, कळतंय का?
काशिनाथ: हो, की वर्गातला सर्वात brilliant मुलगा मी आहे!!
नंदिता धुरीची पहिल्या पत्नीची समंजस भूमिका असो, की वैदेही परशुरामीची एका उभरत्या वयात उभरत्या कलाकारावर फिदा होणारी कांचन घाणेकर असो किंवा सुमित राघवनचा धीर गम्भीर श्रीराम लागू, सोनालीच्या मुलीला जपणाऱ्या सुलोचनादीदी असो, काशीनाथवर जिवापाड प्रेम करणारा प्रभाकर पणशीकर अर्थात प्रसाद ओक असो.. सगळेच नैसर्गिक आणि जमून गेल्यासारखे वाटतात.. थोडेफार सत्य घटनेपासून इकडेतिकडे झालेले असू शकते.. कारण तेव्हा काही मीडिया, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्युब नव्हते ना सगळं पावलोपावली नोंदवून ठेवायला!! असो! दिगदर्शक, सहायक दिगदर्शक, पटकथा लेखक व इतर सहयोगी टीम सगळ्यांचेच अभिनंदन!
सिनेमाचे प्रथम सहयोगी दिगदर्शक अर्थात first assitant director (बरोबर आहे ना??) आणि एका मित्राद्वारे ओळख झालेले मकरंद शिंदे ह्यांचेही खास अभिनंदन! चुकभुल देणेघेणे! आम्ही अडाणी आहोत.. काहीच तांत्रिकदृष्ट्या कळत नाही!!